इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, ता.25: पुणेकरांनो, तुम्हाला पोलिस (PunePolice) तक्रार करायची आहे? किंवा पोलिस तपासासंबंधी काम करून घ्यायचेय… तर तुम्हाला आता मेडिक्लेम काढावा लागणार आहे. मेडिक्लेम काढल्यानंतरच तुमचे पोलिसांशी संबंधित काम होऊ शकणार आहे.. सध्या पुणे जिल्हा पोलिस मुख्यालयात कामासाठी गेलेल्या अनेक सामान्य पुणेकरांनी हा अनुभव घेतलेला आहे, कदाचित तुम्हालाही तो येऊ शकतो.
वरील माहिती वाचून तुम्हाला धक्का बसेल, पण त्यासंदर्भात असा कुठलाही शासकीय आदेश किंवा पोलिस विभागाचा अंतर्गत आदेश नाही.. तर हा ‘पंडित’पूर्ण उपक्रम पुणे पोलिसांमधील एका शिपायाने विमा एजंट असलेल्या त्याच्या बायकोला जास्तीत जास्त व्यावसायिक ‘संतोष’ मिळावा म्हणून सुरू केला आहे.
इतकेच नव्हे तर आधुनिक संगणक तंत्राची आवड असलेल्या हा कर्मचारी विविध समाजमाध्यमांवर सक्रीय असून या संदर्भातील जाहिरातीही वेगवेगळ्या ग्रुपमधील लोकांना पाठवत असतो. मात्र याच्याशी संपर्क येणाऱ्या तक्रारदारांना ‘तक्रार नको, पण विमा आवरा’ असे म्हणण्याची वेळ येत असून त्यातील काही जण पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे जाण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे.
उरळी कांचन येथील श्री पवार यांनी दोन वर्षांपूर्वी मेडिक्लेम पॉलिसी काढली होती. पुढे बायकोचे आजारपण आणि घरच्या इतर आजारपणात त्यांना या स्टार पॉलिसीचा उपयोग होऊन दोन वर्षात चार वेळा त्यांचे सुमारे पावणेदोन लाखांचे क्लेम मंजूर झाले.. तुम्हीही क्लेम काढा त्यासाठी संपर्क करा.. स्वतःच्या बायकोच्या नावाने असे संदेश हा पोलिस शिपाई विविध समाजमाध्यमांमध्ये व्हायरल करत असतो.
हा पोलिस शिपाई सध्या पुणे जिल्हा पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर असून मुळचा पूर्व हवेलीतील रहिवासी आहे. पोलिसात असतानाच त्याने गुन्हेही केले असून दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर आहे. त्याबद्दल त्याला दोनदा निलंबितही केले आहे. त्याचे गुन्हे इतकी गंभीर आहेत, की त्याला निलंबनाऐवजी बडतर्फ करायला हवे होते, मात्र दोन्ही वेळेस त्याने आपल्या ‘पंडित’ पूर्ण बोलांनी वरिष्ठ यंत्रणेला ‘संतोष’ दिल्याने त्याची नोकरी टिकून असल्याचे समजते.
निलंबनानंतर पुन्हा कामावर घेतले, तेव्हा त्याच्यावरील गुन्हे आणि त्याचे उपदव्याप पाहता या कर्मचाऱ्याला पुणे पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर ठेवले. परिणामी सध्या त्याच्यावर अनेक ‘अर्थाने’ बंधने आलीत. म्हणून सध्या त्याने तक्रारदार नागरिकांना हाताशी धरून ‘डबल इंकम’चा हा धंदा ऑफीसमध्ये बसल्या बसल्याच सुरू केला असून सध्या त्याच्या या ‘पांडित्यपूर्ण’ व्यवहाराची चर्चा पोलिस खात्यात सुरू आहे. दुसरीकडे या असल्या शिपायावर वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे विमापीडित तक्रारदारांचे लक्ष लागून राहिले आहे.