इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणेकरांना मेट्रोच्या माध्यमातून आशेचा किरण दिसू लागला आहे. मात्र पुणे मेट्रोच्या मार्ग ३ वरील काम पुन्हा एकदा अंतिम मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जनतेला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पुणे मेट्रो मार्ग- ३ हा शहरातील प्रमुख आयटी हब हिंजवडीला
शिवाजीनगरशी जोडतो. त्यामुळे हा मार्ग आयटी प्रोफेशनलसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग २३.३३ किमी लांबीचा एलिव्हेटेड असून, सध्या ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. सुरूवातीला हा प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अंतिम मुदत सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो 3 ची पुणेकरांना आता आणखीनच प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रामध्ये नाराजी आणि चिंता व्यक्त केली जात आहे.
. शहराच्या विकासासाठी तसेच वाहतुकीच्या सोयीसाठी हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिक आणि व्यावसायिकांकडून केली जात आहे. वारंवार होणाऱ्या विलंबामुळे आयटी असोसिएशनने चिंता व्यक्त केली आहे. जर वेळेत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही, तर अनेक आयटी व्यावसायिक पुण्याबाहेर स्थलांतर करण्याचा विचार करू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. आता हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.