इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकले. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणावरून मंगेशकर रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे स्वीय सहाय्यक असूनही तसेच मंत्रालयातून दोन-चार वेळा फोन येऊनही रुग्णालयाने त्यांच्या पत्नीवर वेळेवर उपचार केले नाहीत याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजकीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून भावनिक पत्र लिहिले आहे.
या पत्रातून सुषमा अंधारे यांनी निस्वार्थपणे पुढाऱ्यांच्या मागे धावणाऱ्या कार्यकर्त्यांना आता स्वतःच्या कुटुंबाचा आणि भविष्याचा विचार करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. नेत्याच्या ताटाखालचं माजर होण्यापेक्षा स्वतःच अर्थकारण, आरोग्य आणि आत्मसन्मान जपणं हेच महत्त्वाचे असल्याचा लाख मोलाचा सल्ला त्यांनी या पत्रातून दिला आहे. त्यांनी या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदाहरणाचा उल्लेख करत खरं नेतृत्व कसं असावं याची आठवण करून देत भुरट्या राजकारणापासून कार्यकर्त्यांनी सावध राहावे असा संदेश दिला आहे.
आपल्या पत्रातून रुग्णालय प्रशासनाची असंवेदनशीलता आणि शासनाच्या भोगंळ कार्यपद्धतीवर सुषमा अंधारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या आमदाराच्या कुटुंबातील व्यक्तीवर अशी वेळ आली असती तर ती व्यवस्था तात्काळ सक्रिय झाली असती, मात्र कार्यकर्त्यांच्या बाबतीत असं होत नाही अशी खंत व्यक्त करत हे वास्तव असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.