इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे, पिंपरी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीच्या ताफ्यात २८३ बसचे आयुर्मान संपलेले आहे. आता पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या दोनशे बस खरेदी करण्यात येणार आहेत. मात्र आर्थिक वर्ष संपले तरी या बस खरेदी करण्याचा मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना या बसची आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या आयुर्मान संपलेल्या २८३ बस अद्यापही शहरातील विविध ररस्त्यांवरून धावत आहेत. मार्च महिन्यापर्यंत पीएमपीच्या खासगी तत्वावरील ४०० पैकी केवळ ९४ बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत, तर एकही आयुर्मान संपलेली बस मोडीत काढण्यात आलेली नाही. तसेच खाजगी तत्त्वावरील बस ताफ्यात दाखल होण्याची प्रक्रिया ही विलंबाने होत असल्यामुळे आयुर्मान संपत असलेल्या बस अद्याप सेवेत आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पीएमपीच्या ताफ्यात स्व-मालकीच्या ९६४ बस आहेत, तर खासगी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या १०१९ अशा एकूण 1 हजार ९८३ बस रस्त्यांवरून धावत आहेत. त्यापैकी २८३ बसचे आयुर्मान आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये संपणार असल्याचे जाहीर करण्यात आले, तर ६०० नवीन बस ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र, नवीन बस ताफ्यात दाखल होण्याल विलंब होत असल्याने आयुर्मान संपलेल्या बस मोडीत काढता येत नसल्याचे स्पष्टीकरण पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आले आहे.