इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली निविदा प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) नवीन बस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारी महिन्यात नवीन बस दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. तर, स्वमालकीच्या बस दाखल होण्यासाठी आणखी दोन महिने लागण्याची शक्यता आहे.
पीएमपी प्रशासनाने ठेकेदारामार्फत ४०० बस आणि स्वमालकीच्या २०० सीएनजी अशा ६०० बस घेण्याचा निर्णय घेतला. या बस खरेदीची प्रक्रिया सुरू केली. या दोन्ही प्रकारच्या बसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामधील ठेकेदारामार्फत चालविल्या जाणाऱ्या ४०० बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्या ताफ्यात येण्यासाठी बांधणी संबंधित कंपन्यांनी सुरू केली आहे. या बस फेब्रुवारीपासून दाखल होण्यास सुरुवात होणार आहेत. या ४०० बस टप्प्या-टप्प्याने येणार आहेत. तसेच, स्वमालकीच्या २०० सीएनजी बसची निविदा प्रक्रियादेखील नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. या बस टाटा कंपनीकडून घेतल्या जाणार आहेत. त्यादेखील मार्च अखेरपासून टप्प्या-टप्प्याने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या एकूण ६५० बसपैकी अद्यापही १६० ई-बस ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत. त्या बस पुढील महिन्यात दिल्या जातील, असे संबंधित कंपनीकडून पीएमपीला वारंवार सांगितले जात आहे. परंतु, बस काही ताफ्यात दाखल होताना दिसत नाहीत. या बस दोन वर्षांपूर्वीच ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते. या सर्व गोष्टींचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. आधीच पीएमपीच्या ताफ्यात बसची संख्या कमी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून १२ वर्षे जुन्या झालेल्या स्वमालकीच्या काही बस सध्या चालविल्या जातात. पण, नवीन बस जशा येण्यास सुरुवात होतील, त्यानुसार जुन्या बस बाद करण्यात येणार आहेत. त्यामुळे ब्रेकडाऊनच्या घटनादेखील कमी होऊन प्रवाशांना चांगल्या बसमधून प्रवास करता येणार आहे.