इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध सावकारीची काही प्रकरणे निदर्शनास आल्याने अशा गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाने अवैध सावकारी गुन्हेगारीच्या संकटाला आळा घालण्यासाठी, त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, अधिक कडक आणि जरब बसविणाऱ्या तरतुदी असणारा विशेष कायदा ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४’ हा अंमलात आणला आहे.
आदेशात नेमकं काय?
अवैध सावकारीच्या अनुषंगाने नागरीकांनी तक्रारी देण्यास पुढे यावे यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याबाबत तसेच नागरीकांकडुन भरमसाठ व्याजाने पैसे उकळणारे, नागरीकांचा छळ करणारे, धमक्या देणाऱ्या सावकारांविरुद्ध तात्काळ कठोर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त यांनी दिले आहेत.
नागरिकांना आवाहन..
अवैध सावकारी किंवा भरमसाठ व्याज आकारणी करुन कोणी फसवणुक करत असेल तसेच तद्अनुषंगाने तक्रारदारास धमक्या किंवा छळाचा धोका असल्यास संबंधितांनी तात्काळ पिंपरी चिंचवड पोलीसांशी संपर्क साधावा. असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.