इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बीड: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला काही दिवसांची मुदत दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, त्यांनी आश्वासन दिलं, त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. सध्या मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरु आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांच्या सभा सुरु आहेत. “मला समाज आशीर्वाद देण्यासाठी येत आहे. आरक्षणासाठी समाज प्रचंड आशावादी आहे. या वेदना सरकारने समजून घेतल्या पाहिजेत. 70 वर्षापासून राज्यातील अनेक नेत्यांना आणि पक्षांना आम्ही मोठं केलं. त्यांनी आता त्याची जाण ठेवली पाहिजे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्वांनी एकजूट झाले पाहिजे. मी समाजाला मायबाप मानले आहे. समाजाची माझ्याकडून अपेक्षा आहे. बीडची भूमी क्रांतिकारी आहे. मराठवाडा क्रांती करूनच एक वर्षांनी स्वतंत्र झाला आहे. आमची एकच मागणी, आरक्षण द्या. एक जरी पुरावा मिळाला, तरीही कायदा पारित करता येतो. पाच हजार कुणबी प्रमाणपत्र मिळाले हा मोठा पुरावा आहे. याचा आधार घेवून आता सरसकट आरक्षण दिले पाहिजे. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “पक्ष आणि नेत्यांनी आता विरोध करू नये. आमचा अंत पाहू नका. भुजबळ म्हणतात मी टीका करतोय, मी खानदानी मराठा आहे. मी चुकीचं बोलत नाही. भुजबळ यांनी मराठ्यांना आरक्षण देवू नका असं म्हंटल्यावर मी टीका केली. तुम्ही म्हणू नका मी टीकाही करणार नाही. आरक्षणाच्या बाजूने रहा, समाज तुम्हाला डोक्यावर घेवून नाचेल असं जरांगे पाटील म्हणाले.
…तर ही विराट गर्दी त्यांनी पाहून घ्यावी’
“सर्व पक्षांनी आता परतफेड करावी, तुमच्या पक्षातील कोणत्या ही नेत्याने आरक्षणाला विरोध करू नये. धनंजय मुंडे यांच्यावर उपरोधक टीका केली. नेत्यांनी टीका करून नये, अन्यथा मी ही टीका करेन” असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. “जातीय जनगणना करा, अथवा 50 टक्क्यांची मर्यादा वाढावा, मला काहीही देणंघेणं नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवंय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “सत्ताधाऱ्यांनी आश्वासक भूमिका घेत नसतील, तर ही विराट गर्दी त्यांनी पाहून घ्यावी, लोक रात्र भर माझ्यासाठी जागे आहेत. सरकारने भावना शून्य होवू नये. सरकारने वेळ घेतला आहे, आता त्यांनी गंभीर व्हावे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.