Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपश्चिम महाराष्ट्रामध्ये 44 हजार 972 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीतः महावितरणकडून पुनर्जोडणीचे काम...

पश्चिम महाराष्ट्रामध्ये 44 हजार 972 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीतः महावितरणकडून पुनर्जोडणीचे काम वेगाने सुरू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

थकीत वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम व नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात पश्चिम महाराष्ट्रामध्ये तब्बल 44 हजार 972 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

दैनंदिन आयुष्यात वीज ही अत्यंत आवश्यक झालेली आहे. मात्र वीज वापरल्यानंतर बिलांचा नियमित भरणा होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १४ लाख १६ हजार ३०० ग्राहकांकडे २५४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- १६५ कोटी १४ लाख रुपये (७,३०,८५०), सातारा- १५ कोटी ३४ लाख (१,४२,९००), सोलापूर- ३१ कोटी ९४ लाख (१,९६,९१५), कोल्हापूर- २३ कोटी ९२ लाख (१,८२,५२०) आणि सांगली जिल्ह्यात १७ कोटी ८५ लाख रुपयांची (१,६३,०५०) थकबाकी आहे.

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर वीजपुरवठा पुन्हा जोडून घेण्यासाठी थकबाकीच्या रकमेसोबतच नियमानुसार ग्राहकांनी पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी भरणे आवश्यक आहे. यासाठी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुनर्जोडणी शुल्क निश्चित केले आहे. यामध्ये लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी २१० रूपये व थ्री फेजसाठी ४२० रुपये तसेच उपरी व भूमिगत वीजवाहिन्यांद्वारे दिलेल्या वीजजोडण्यांच्या पुनर्जोडणीसाठी सिंगल फेजसाठी प्रत्येकी ३१० रुपये व थ्री फेजसाठी प्रत्येकी ५२० रुपये शुल्क आहे. तर उच्चदाब वर्गवारीसाठी ३१५० रुपये शुल्क लागू आहे. या शुल्कांवर १८ टक्के जीएसटी कर लागू आहेत.

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत रक्कम आणि नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटीचा भरणा केल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत करावा असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत.

दरम्यान थकबाकीमुळे गेल्या महिन्याभरात पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ४३ हजार ६१५ आणि इतर अकृषक १३५७ अशा एकूण ४४ हजार ९७२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्हा- २९ हजार ४४०, सातारा- ३,२५८, सोलापूर- ६,१५४, कोल्हापूर- ३,०६२ आणि सांगली जिल्ह्यातील ३,०५८ थकबाकीदारांचा समावेश आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरु आहे. ही कटू कारवाई तसेच नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा, वीज नसल्याने गैरसोय होणे आदी टाळण्यासाठी थकीत वीजबिलाची रक्कम ताबडतोब भरावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments