इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखयांच्या हत्येने राज्य ढवळून निघालं असून त्याची जास्त धग ही बीड जिल्ह्याला अधिक बसली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यतील वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच गेल्या काही दिवसात बीडमधील अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी डीपीडीसी बैठकीच्यावेळी कडक शब्दांत सुनावले आहे. त्यानंतर पर्यावरण मंत्री पकंजा मुंडे यांनीही कडक शब्दांत आपली भूमिका मांडली.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात कानउघाडणी केली. ‘जर कुणी खंडणी मागितली तर, मी त्याला मकोका लावायला मागे-पुढे पाहणार नाही”, असा थेट इशारा अजित पवार यांनी बैठकीत दिला. त्यानंतर पर्यावरण मंत्री पकंजा मुंडे म्हणाल्या की, ‘कुठेही अशाप्रकारची घटना घडणं चूक आहे. यामध्ये जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना थेट फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे.’
परळी, परळी करु नका
बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या थेट बोलल्या. ” परळी, परळी करु नका. तुमचा फोकस परळीकडे आहे. यात जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना थेट फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. माझ्याकडे माहिती आलेली आहे. कोणत्या मतदारसंघात काय घडत आहे, याची संपूर्ण माहिती आहे.’
उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्यात अनेक उद्योग येण्यासाठी इच्छुक आहेत, पण एखाद्या घटनेमुळे किंवा दुर्देवी प्रसंगामुळे आपल्या जिल्ह्याची प्रतिमा मलिन नको. ते उद्योग दूर जायला नको, असेही मुंडे म्हणाल्या.