Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपत्नी अन् सासूला धडा शिकवण्यासाठी जाळल्या 15 दुचाकीः पुण्यात जावयाने सासुरवाडीत जाऊन...

पत्नी अन् सासूला धडा शिकवण्यासाठी जाळल्या 15 दुचाकीः पुण्यात जावयाने सासुरवाडीत जाऊन केला प्रताप; सिंहगड पोलिसांत गुन्हा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बायकोसोबतच्या वादातून नवऱ्याने सासूच्या घरी जाऊन त्यांच्या पार्किंगमधील तब्बल 15 दुचाकी पेटवून दिल्याची विचित्र घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 1 मे रोजी वडगाव बुद्रुक येथील कॉर्पोरेशन इमारतीत ही घटना घडली. गणेश दिनकर दहिभाते (35) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी जयश्री पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी जयश्री यांची मुलगी व गणेश यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण त्यांच्यात नेहमीच भांडण होत असल्यामुळे त्यांची मुलगी वडगाव बुद्रुक येथील त्यांच्या घरी राहण्यास आली होती.

आरोपी गणेश दहिभाते 1 मे रोजी आपल्या पत्नीला भेटण्यासाठी कॉर्पोरेशन इमारतीत आला होता. तेव्हा त्याचे पुन्हा त्याच्या पत्नीशी भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात बायकोला धडा शिकवण्यासाठी त्याने सासू जयश्री यांची दुचाकी पेटवून दिली. यावेळी या आगीच्या विळख्यात इतरही दुचाकी सापडल्या. त्यामुळे या घटनेत पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या इतर 14 दुचाकी भस्मसात झाल्या.

सर्वसामान्यांच्या दुचाकी जळून खाक

पत्नी आणि सासूला धडा शिकविण्यासाठी गणेशने त्यांची दुचाकी पेटवून दिली. मात्र, काही क्षणातच आगीचा भडका उडाल्यामुळे पार्किंगमधील इतर दुचाकींनी पेट घेतला. परिणामी अल्पवधीतच 14 दुचाकी जळून भस्मसात झाल्या. या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत सर्वसामान्यांची दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.

पत्नी नांदायला येत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न

सासू-सासऱ्याच्या सांगण्यावरुन पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून संतप्त झालेल्या एका तरूणाने पोलिस चौकीतच अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना महात्मा फुले पोलिस चौकीत घडली. याप्रकरणी नवनाथ कचरु लोखंडे (वय 26 रा. डोमखेल रोड, वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई मुकेश अशोक पानपाटील (वय 31) यांनी या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथच्या पत्नीला तिचे आई-वडील त्याच्याबद्दल काहीही सांगत होते. त्यामुळे पत्नी त्याला सोडून सासरी राहण्यास येत नसल्याचा त्याला संशय होता. बुधवारी सकाळी तो याचा जाब विचारण्यासाठी सासुरवाडीला गेला. मात्र, घरी कोणी नसल्याने त्याने पत्नीला फोन करुन विचारले. त्यावेळी तिने महात्मा फुले पोलिस चौकीत असल्याचे सांगितले. त्यानंतर नवनाथने पोलिस चौकीत बॉटलीत पेट्रोल घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण कर्मचाऱ्यांनी वेळीच त्याला पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments