Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजपत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने चुलत भावांमध्ये वाद; धायरी येथे बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू

पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने चुलत भावांमध्ये वाद; धायरी येथे बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कौटुंबिक वादातून झालेल्या झटापटीत एका तरुणाचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात घडली. या प्रकरणी चुलतभावाला नांदेड सिटी पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. अमर किसन देशमुख (वय ३५, रा. कपिल अपार्टमेंट, मतेनगर, धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर राजू भुरेलाल देशमुख (रा. कपिल अपार्टमेंट, मतेनगर, धायरी) असे अटक करण्यात आलेल्या चुलतभावाचे नाव आहे. मोहपत हरीराम साहारे (वय ३६, रा. धायरी) यांनी याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू आणि त्याचा चुलतभाऊ अमर दोघेही मूळचे मध्य प्रदेशातील आहे. ते खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीत कामाला आहेत. शुक्रवारी (दि. १४) रात्री साडेआठच्या सुमारास राजू आणि अमर यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाले. पत्नीबद्दल अपशब्द काढल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर अमर राजू याच्या अंगावर धावून गेला. या झटापटीत राजूने अमरला धक्का दिल्याने तो घराच्या बाल्कनीतून खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तेथील रहिवाशांनी अमरला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, गंभीर जखमी झालेल्या अमरचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर राजू हा घरातून बाहेर गेला होता. त्याला दुसऱ्या दिवशी अमरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार, नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक गुरुदत्त मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी राजूची चौकशी केली. या चौकशीत राजुने कौटुंबिक वादातून बाल्कनीत थांबलेल्या चुलतभाऊ अमरला धक्का दिल्याने तो बाल्कनीतून पडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत चुलतभावाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी राजूला अटक केली. पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments