Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजपंचनामा : वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर....

पंचनामा : वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर….

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः देशात महिला आजही असुरक्षिततेच्या छायेखाली जगत आहेत. स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी सामान्य बाब होऊन गेली आहे. कोलकातामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. त्यापाठोपाठ बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. बदलापूरनंतर राज्यात पुणे, लातूरमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना उजेडात आल्या आहेत. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.

कोलकातामधील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात ९ ऑगस्टला रात्री काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या ३१ वर्षीय ज्युनिअर डॉक्टर तरुणीवर संजय रॉय या आरोपीने लैंगिक अत्याचार करत तिची हत्या केली. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात डॉक्टरांनी संप पुकारला. डॉक्टर तरुणीला न्याय द्या आणि आरोपीला फाशी द्या, अशी घोषणा महाराष्ट्रातला प्रत्येकजण देऊ लागला. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणातील आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन त्याने मला फाशी द्या असं म्हटलं आहे. डॉक्टर मुलगी शिकली, पण वाचली नाही, असं प्रत्येकजण म्हणू लागला.

कोलकात्यातील डॉक्टर तरूणीवरील अन्यायाची घटना ताजी असतानाच बदलापूरमध्ये संतापजनक घटना घडली आहे. ज्याला शाळेच्या सफाईसाठी नेमलं होतं, त्या नराधमाने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला. 12 ऑगस्टला तीन वर्षे आठ महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर 13 ऑगस्टला पुन्हा एका सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना तेव्हा समोर आली, जेव्हा अत्याचार झालेल्या एका चिमुरडीने आपल्या आईकडे गुप्तांगात त्रास होत असल्याची तक्रार केली. जेव्हा डॉक्टरांनी या चिमुरडीला तपासले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. आपल्या अवघ्या साडे चार वर्षांच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं, हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.

या घटनेला सात दिवस झाल्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरत न्यायाची मागणी केली. ज्या शाळेत ही घटना घडली, त्या शाळेसमोर शेकडो पालकांचा जत्था लोटला. जोरदार आंदोलन करत शाळेची तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली. तसेच, बदलापूर रेल्वे स्थानकात लोकांनी रेल्वे रुळावरच आंदोलन केले. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हटणार नाही असं या नागरिकांनी सांगितले. ज्या शाळेत आरोपीने हे सगळ केलं, तिथेच त्याला शिक्षा व्हावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. तसेच, या शाळेतील हे पहिलं नाही, तर चौथं प्रकरण असून यापूर्वीची प्रकरणे शाळेकडून दाबण्यात आल्याचा दावा पालकांनी केला आहे. त्यामुळे आरोपीला काय शिक्षा होणार, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तसेच मुलगा शिकला, तो सुसंस्कृत झाला, स्त्रियांचा आदर करायला शिकला, तर या देशाची आणखी प्रगती होईल.

कोलकाता आणि बदलापूरपाठोपाठ पुण्यातील एका नामांकित शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १५ ऑगस्ट या दिवशी घडली. पीडित मुलगी ही सातवीच्या वर्गात शिकत आहे. तर अत्याचार करणारा आरोपी हा त्याच शाळेतील विद्यार्थी होता. हा संपूर्ण प्रकार शाळेतील स्वच्छतागृहाजवळ घडला.

कोलकाता, बदलापूर आणि पुणे येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असताना लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाण्याअंतर्गत एका साडेचार वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात साडेचार वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १९ वर्षीय आरोपीच्या घरासमोर चार वर्ष दहा महिन्यांची मुलगी राहत होती. १७ ऑगस्टला आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणातील १९ वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर आपली चिमुरडी मुलं शाळेत देखील सुरक्षित नसल्याची भावना पालक आता व्यक्त करू लागले आहेत.

जर वारंवार अत्याचार होत राहिले, तर आम्ही जगायचं कसं, असा प्रश्न प्रत्येक स्त्रीला पडू लागला आहे. मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणीला पैशाची नाही, तर सुरक्षेची गरज आहे, असा नारा आता प्रत्येक स्त्री देऊ लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments