Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ जणांचे पोलिस संरक्षण काढले

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ जणांचे पोलिस संरक्षण काढले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शहरातील विविध क्षेत्रातील ८५ व्यक्तींना पुरविण्यात आलेले वैयक्तिक पोलिस संरक्षण काढून घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक-व्यावसायिकांना त्यांच्या मागणीनुसार पोलिस संरक्षण उपलब्ध करून दिले जाते. शहरातील ११० जणांना वैयक्तिक पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

त्यापैकी ८५ जणांचे पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून आढावा घेण्यात आला. त्यानंतर ८५ जणांचे वैयक्तिक पोलिस संरक्षण काढून घेतले आहे. त्यामुळे सुमारे ३५० पोलिस कर्मचारी उपलब्ध होणार आहेत.

या मनुष्यबळाचा वापर निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात येईल. याशिवाय अन्य ५४ जणांनी पोलिस संरक्षणासाठी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. शस्त्र परवानाधारक नागरिकांकडून पिस्तूल, रिव्हॉल्वर, बंदूक अशी शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.”

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त कायम राहील. आवश्यकता नसलेल्या २५ ठिकाणचा बंदोबस्त काढून घेण्यात आला आहे.

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. नाकाबंदीसाठी ठिकाणे निश्चित करण्यात येत आहेत. प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments