इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : लोकसभा आणि त्यानंतर काही राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून आपल्या पक्षसंघटनेत सातत्याने बदल केले जात आहेत. आता होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्ष आता तिकीट वाटपासाठी एक नवीन प्रक्रिया आणण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 338 जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणुकीत तिकिटांच्या वाटपासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याच्या प्रस्तावावर पक्ष विचार करत असल्याची माहिती समोर आली.
तिकीट वाटपासंदर्भातील या नव्या प्रक्रियेंतर्गत सत्तेचे विकेंद्रीकरण केले जाईल आणि जिल्हास्तरीय पक्ष संघटनेला अधिक अधिकार दिले जातील अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान काँग्रेसने याआधी आपल्या पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत.
काँग्रेसच्या या बैठकीत पक्ष त्यांच्या जिल्हा काँग्रेस समितीला अधिक अधिकार देईल आणि त्यांना स्वायत्तपणे काम करण्यासाठी अनेक गोष्टींमध्ये स्वातंत्र्य देईल यावर चर्चा झाली. निवडणुकीसाठी तिकीट वाटपात डीसीसीला भूमिका देण्याच्या प्रस्तावावर बैठकीत सकारात्मक विचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.