इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहर, ग्रामीण भागात धावणाऱ्यापीएमपी बसचालक-वाहकांकडून नियमांचे वारंवार उल्लंघन होत आहे. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, संबंधितावर कारवाई केली जाईल, असे आदेश पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहेत. पीएमपी बसचालक आणि वाहकांवर कारवाई केली जाणार परिवहन महामंडळाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या ग्रामीण भागात व पीएमपीआरडीए कार्यक्षेत्रापर्यंत बससेवा पुरविली जात आहे. त्यामध्ये पीएमपी व खासगी ठेकेदाराच्या बसेसवरील चालक सेवक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नाहीत, अशा तक्रारी सजग नागरिक मंच, पीएमपी प्रवासी मंच प्रवाशी नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होत आहेत.
या तक्रारीमध्ये प्रामुख्याने मोबाईलवर बोलत बसेस चालविणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धुम्रपान करणे, रूट बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे इ. तक्रारीचा समावेश आहे. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार महामंडळाकडील चालक वाहक सेवकांच्या गैरवर्तनाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निराकरण होणाच्या दृष्टीने महामंडळाने कार्यालय परिपत्रकाद्वारे चालक-वाहकांना सूचना दिल्या आहेत.
बस संचलन करताना मोबाईल फोनचा वापर करू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन योग्यरित्या करणे, धुम्रपान करण्यात येऊ नये, बसेस बस थांब्यावरच थांबवाव्यात, लेनच्या शिस्तीचे पालन करणे, भरधाव वेगाने बसेस चालू नये अशा विविध प्रकारच्या सुचना दिलेल्या आहेत. तरी यापुढे वरील नियमांचे पालन न केल्यास सदरील तक्रारीचे शहानिशा करून संबंधित चालक-वाहकीवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे महामंडळाकडुन कर्मचाऱ्यांना आदेश दिलेले आहेत.