Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजनाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी; डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला...

नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी; डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे-नाशिक फाटा ते चांडोली या ३० किलोमीटर लांबीच्या ८ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, याबद्दल खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहेत. चाकणची वाहतूक कोंडी हा अतिशय गंभीर व चिंतेचा विषय बनला होता. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे सातत्याने नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होते.

सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनात अमोल कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेऊन तातडीने या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळावी असा आग्रह धरला होता. त्यावेळी लवकरच मंजुरी देण्याचे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आज केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक फाटा ते चांडोली या ३० कि.मी. लांबीच्या ८ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या ७८२७ कोटी कामाला मंजुरी दिली आहे.

याबाबत खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, नाशिक फाटा ते चांडोली या राष्ट्रीय महामार्गासाठी गेली ३-४ वर्ष अनेक पातळ्यांवर लढाई लढावी लागली. सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी या एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता संपताच या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुरू होईल अशी अपेक्षा असतानाच तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरूर हे दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे हस्तांतरीत करण्यात आले.

त्यामुळे नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या भवितव्याविषयी शंका व्यक्त करण्यात येत होत्या. अशा परिस्थितीत मी हा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प मार्गी लागला नाही, तर भावनांचा उद्रेक होईल ही बाब लक्षात घेऊन सर्वशक्तीनिशी प्रयत्न करीत या संसद अधिवेशनात केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी देण्याची मागणी केली होती.

आज या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाल्यामुळे माझ्या प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद आहेच, पण त्याचबरोबर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर झाल्यानंतर चाकणसह या महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार, याचे विशेष समाधान आहे. आता तांत्रिक बाबींची लवकरात लवकर पूर्तता करुन या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुरू व्हावे, यासाठी मी प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा करणार असून मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments