इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन : पुणे-दौंड लोहमार्गावरील नायगाव – पेठ परिसरातरेल्वे समोर उडी घेऊन एका 45 वर्षीय विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. 10) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
सतीश काशिनाथ लोणकर, (वय 45, रा.पेठ (ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नेमक्या कोणत्या गाडीसमोर उडी घेतली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश लोणकर हा कुटुंबासोबत पेठ परिसरात राहतो. मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सतीश लोणकर याला दारूचे पिण्याचे व्यसन असल्याची माहिती काही नातेवाईकांनी दिली. मागील दोन दिवसांपूर्वीहि त्याने रेल्वेसमोर जाऊन जीव देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही नागरिकांनी त्याची समजूत काढून त्याला थांबवले होते.
आज बुधवारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे-दौंड लोहमार्गावरील नायगाव -पेठ परिसरात असलेल्या रेल्वे समोर उडी घेऊन सतीश लोणकर याने आत्महत्या केली. सदरची माहिती स्थानिक नागरिकांनी उरुळी कांचन पोलिसांना तात्काळ दिली. त्यानुसार त्याठिकाणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार मत्रे, रमेश भोसले, पोलीस हवालदार रासकर व सुमित वाघ यांनी तात्काळ धाव घेतली.
दरम्यान, पोलिसांनी कस्तुरी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून लोणकर यांना उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र लोणकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.