Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजनायगाव-कुंजीरवाडी रस्त्यावर दोन दुचाकींचा अपघात; उपचारादरम्यान 9 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

नायगाव-कुंजीरवाडी रस्त्यावर दोन दुचाकींचा अपघात; उपचारादरम्यान 9 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर : नायगाव- कुंजीरवाडी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याची घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुक्रवारी (ता. 1) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात 9 वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र चिमुकल्याची 5 दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज आज बुधवारी (ता. 6) सकाळी मालवली.

आयुष प्रवीण शिर्के (वय-9, रा. कुंभारवाडा, दौंड जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष शिर्के याचे मामा निखिल दत्तात्रय कुंभार हे नायगाव (ता. हवेली) येथे कुटुंबासोबत राहतात. तर आयुष शिर्के हा दिवाळीनिमित्त मामाच्या गावी आला होता. आयुष शिर्के हा त्याच्या नातेवाईकासोबत दिवाळीची खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून चालला होता. नायगाव- कुंजीरवाडी रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना, नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली होती. या अपघातात आयुष शिर्के हा जखमी होऊन त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

आयुष शिर्के याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आयुष शिर्के याच्यावर मंगळवारी (ता. 5) अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र बुधवारी (ता. 6) सकाळी उपचारादरम्यान आयुषची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, आयुष शिर्के हा मामाच्या गावी दिवाळी साजरी करण्यासाठी आला होता. मात्र दिवाळीची खरेदी करण्यासाठी जाताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच अपघात झाला. आणि आयुषची ही शेवटची दिवाळी ठरली. त्याच्या निधनाने नायगाव व दौंड परिसरात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments