इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नागपूर : गेल्या दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात आता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी विरोधात कारवाईचा फास आवळला जाणार आहे. नागपूर पोलिसांसोबतच दहशतवाद विरोधी पथकाने नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी जवळपास 50 हून आरोपींना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. मात्र आता दहशतवाद विरोधी पथकाने नागपूरात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने असामाजिक तत्व काही वर्षांपूर्वी दगडफेक करायचे, त्याच प्रकारची दगडफेक नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी झाली होती. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी दहशतवाद विरोधी पथकाने सुरू केली आहे. हिंसाचाराच्या वेळी पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला. हा हल्ला सुनियोजित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केले होते. त्यानुसार या प्रकरणात कोणी आर्थिक मदत केली आहे का याचा सुद्धा तपास नागपूर पोलीस आणि दहशतवादी पथक करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूरमध्ये घडलेल्या या हिंसाचारानंतर कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याठिकाणी वैद्यकीय कारण वगळून इतर कारणासाठी घराबाहेर पडण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे.