Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज नशेची फॅक्टरी! ड्रग्ज बनविणारे कारखाने उघडकीस, महाराष्ट्र हादरून गेला

नशेची फॅक्टरी! ड्रग्ज बनविणारे कारखाने उघडकीस, महाराष्ट्र हादरून गेला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थांचे रॅकेट चालविणाऱ्या ललित पाटील नावाच्या इसमाच्या अत्यंत गूढ, साहसी आणि तितक्याच सुरस अशा एकेक ‘ललित कथा’ समोर येत असताना पालघर, पैठण आणि छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीत राजरोस सुरू असलेले ड्रग्ज ‘बनविणारे कारखाने उघडकीस आल्याने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे.

औद्योगिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्यात अमली पदार्थांचे इतक्या घाऊक प्रमाणात उत्पादन होत असेल, याची कोणी कल्पना केली नसेल. आजवर साखर कारखानदारीमुळे नावारूपाला आलेल्या या राज्याने आता मोळीपासून मळीपर्यंत आणि मळीपासून थेट नशेच्या गोळ्यांपर्यंत मजली मारली आहे! मात्र, युवाशक्ती बर्बाद करणारी अमली पदार्थांची ही कारखानदारी देशाला, समाजाला परवडणारी नाही. आजवर केवळ विमानतळ अथवा बंदरात चोरट्या मार्गाने येणारे चरस, कोकेन, ब्राऊन शुगर, एमडी, मेफेड्रोन, केटामाइनसारखे अमली पदार्थ आता पालघर तालुक्यातील दुर्गम अशा मोखाडा अथवा पैठण, कांचनवाडी अथवा वाळूजसारख्या औद्योगिक वसाहतीत तयार होत असतील तर या ‘ब्लॅक मॅजिक’ धंद्याची पाळेमुळे खूप खोलवर रुजली असावीत.

ड्रग्जच्या आहारी गेलेली एक पिढी कशी बर्बाद झाली, हे पंजाबने अनुभवले आहे. तिथे सीमेपल्याड, पाकिस्तानातून अमली पदार्थांची तस्करी होते. काल-परवा पडलेल्या धाडीतून समोर आलेले ‘गुजरात कनेक्शन ही थक्क करणारे तितकेच काळजीत टाकणारे आहे. गेल्या काही दिवसांत गुजरातमधील बंदरांमध्ये तस्करीमार्गे आलेले अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात हस्तगत केले गेले. आंतरराष्ट्रीय बाजारात ज्याची किंमत कोट्यवधी डॉलर असते. ड्रग्ज तस्करांनी शाळा-महाविद्यालयांपर्यंत आपले जाळे विस्तारल्याचे लक्षात आल्याने गुजरातमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून या ड्रग्ज तस्करीच्या विरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. त्यातून संभाजीनगरातील ‘ड्रग्ज फॅक्टरी’चे धागेदोरे लागले!

या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेशकुमार हिन्होरिया ऊर्फ प्रेमजीभाई पटेल हा सुरतजवळील बाटोद गावचा रहिवासी. वर्षभरापूर्वी तो संभाजीनगरात स्थायिक झाला. फिजिक्स विषयात पदवीधर असलेला जितेशकुमार या गोरख धंद्यातील ‘मास्टरमाइंड’ समजला जातो. अमली पदार्थ बनविण्यासाठी लागणारी मशिनरी बनविण्यात तो एक्सपर्ट आहे. एखादी केमिकल फॅक्टरी हेरायची, मालकाशी दोस्ती करून ड्रग्ज बनविण्यास प्रेरित करायचे, सेटअप उभारून द्यायचा आणि तयार मालाची तस्करी करण्यास मदत करायची. अशी त्याची मोड्स ऑपरेंडी!

स्थानिक पातळीवर तयार माल न विकण्याची दक्षता घेतल्याने त्याचा सुगावा स्थानिक पोलिस अथवा महसूल गुप्तचर यंत्रणेला लागू शकला नाही. मात्र, अहमदाबादेत पकडलेल्या एका ड्रग्ज तस्कराकडून टिप्स मिळाल्याने या ड्रग्ज फॅक्टरीचा भांडाफोड झाला. अन्यथा, याचा सुगावा लागणे आणखी अवघड झाले असते! महाराष्ट्रात तयार होणारे ड्रग्ज गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीपासून ते तामिळनाडूमार्गे थेट युरोपपर्यंत पोहोचविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रश्न असा की, सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणाऱ्या या अमली पदार्थाची चैन करतो तरी कोण ? अर्थातच, उच्चभ्रू वर्गातील तरुणाई! मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई आदी महानगरात पोलिसांनी केलेल्या कारवायांतून ही बाब स्पष्ट झालेली आहे.

व्हॉट्सअॅप, फेसबूक, टेलिग्रामसारख्या समाजमाध्यमातून हे ड्रग्ज रॅकेट चालविले जाते. महामार्गालगतचे ढाबे, फार्म हाऊस, क्लब हाऊस, पब्ज आणि कॉलेज कॅन्टिन ही ड्रग्ज मिळण्याची हमखास ठिकाणे आहेत! ‘उड़ता पंजाब’मधली ती कथा आता केवळ सिनेमापुरती राहिलेली नाही. महानगरापासून लहानमोठ्या शहरांपर्यंत अमली पदार्थांचे जाळे विस्तारले असून या राक्षसी विळख्यातून युवाशक्तीची सुटका कशी करायची हाच मोठा प्रश्न आहे. केवळ स्थानिक पोलिसांवर जबाबदारी टाकून भागणार नाही. समाजानेदेखील सजग होण्याची गरज आहे. उच्चभ्रू मुलांची थेरं म्हणून इतरांनी सुशेगात राहू नये. कारण, आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या व्हाइटनर, पेनबाम, नेलपेंट, कफ सिरफपासून या नशेची सुरुवात होते! पहिला दम घरात मारण्याची सवय जडल्यानंतर पुढचा उंबरठा ओलांडण्यास कितीसा वेळ लागणार? आपली मुलं या ड्रग्ज फॅक्टरी’ची ग्राहक तर नाहीत ना, जरा तपासून घ्या!.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments