Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजनव्या टर्मिनलवरून ८ फेब्रुवारीपासून 'डिजीयात्रा' सेवा !

नव्या टर्मिनलवरून ८ फेब्रुवारीपासून ‘डिजीयात्रा’ सेवा !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर येत्या ८ फेब्रुवारीपासून ‘डिजीयात्रा’ ही प्रणाली कार्यान्वित होणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या सेवेचा प्रारंभ केला जाणार आहे. ‘डिजीयात्रा’ ही सेवा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवर कार्यान्वित होती. मात्र, नवीन टर्मिनलवर ‘डिजीयात्रा’ची सेवा प्रतीक्षेत होती. या संदर्भातील सर्व परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून ही प्रणाली सेवेसाठी सज्ज होत आहे. देशांतर्गत प्रवाशांसाठी विमानतळ प्रवास सोपा आणि सोयीस्कर करण्यासाठी डिजीयात्रा सुविधा सुरू करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कायापालट होत असून, हे विमानतळ अधिकाधिक अद्ययावत सोईसुविधांयुक्त करण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. ‘डिजीयात्रा’ प्रणाली कार्यान्वित करणे हा त्यापैकीच एक भाग आहे. ‘डिजीयात्रा’ पूर्णपणे बायोमेट्रिक सेल्फ-बोर्डिंग सिस्टम देते, ज्यामुळे प्रवाशांना प्रवेशद्वारापासून विमानात पोहोचेपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडता येते. देशभरात १ डिसेंबर २०२२ पासून डिजीयात्रा सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रणालीअंतर्गत ८० लाखांहून अधिक उपभोक्ते जोडले गेले आहेत. तसेच ४ कोटींहून अधिक वेळचा प्रवास या सेवेतून झालेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या ‘डिजीयात्रा’चे वापरकर्ते वाढत आहेत. पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या ‘डिजीयात्रा’ वापरकत्यांची संख्या अधिक असल्याने याचा मोठा फायदा पुणेकर विमान प्रवाशांना होणार आहे, असेही मोहोळ म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments