इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नालासोपाराः आपल्या पतीची हत्या करून मृतदेह घरातच पुरणाऱ्या पत्नी कोमल चौहान आणि तिचा प्रियकर मोनू शर्मा या दोघांना पेल्हार पोलिसांनी पुण्यातील हडपसर येथून अटक केली आहे. केवळ २४ तासांत गुन्हा उघड करत पोलिसांनी आरोपींना पुण्याहून ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात हलवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल आणि मोनू यांच्यात विवाहबाह्य संबंध होते. कोमलचा पती विजय त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत होता, त्यामुळे दोघांनी त्याला हटवण्याचा कट रचला. त्यांनी विजयची निघृण हत्या करून मृतदेह राहत्या घरातच टाईल्सखाली पुरला.
घटनेनंतर कोमल आणि मोनू दोघेही बेपत्ता झाले. विजयच्या भावाला घरातील टाईल्सचा रंग वेगळा वाटल्याने त्याने त्या काढून पाहिल्या असता दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले आणि हत्या उघडकीस आली.
गुन्ह्याच्या तपासासाठी पेल्हार पोलीस, विरार गुन्हे शाखा आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेने संयुक्त तपास सुरू केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत पुण्याच्या हडपसर परिसरात आरोपींना पकडण्यात आले. कोमल चौहानसोबत तिचे लहान मूलही होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आता या दोघांना पेल्हार पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत एक मोठं आव्हान पार केलं आहे.