इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि आत्महत्यांचं प्रमाण चिंताजनक प्रमाणात वाढत चाललं आहे. हत्या, कोयता गँग, दरोडे आणि आत्महत्यांचे प्रकार दररोज समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये एका २५ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली होती. तिच्या चिठ्ठीत ‘सॉरी! माझी जगायची इच्छा संपली’ असे लिहून तीने आपलं जीवन संपवलं होतं. या घटनेला महिना उलटत नाही, तोच पुण्यात आणखी एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे.
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील कल्पक सोसायटीमध्ये राहणाऱ्या मयुरी देशमुख (वय अंदाजे ३०) या महिलेने आपल्या सहा वर्षीय मुलासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवार, १८ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. उंचावरून खाली पडल्याने आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी देशमुख या त्यांच्या कुटुंबीयांसह कल्पक सोसायटीत राहत होत्या. काही दिवसांपासून त्या मानसिक तणावाखाली होत्या, अशी प्राथमिक माहिती शेजाऱ्यांकडून समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी मयुरीने एक चिठ्ठी लिहिल्याचं आढळून आलं असून, त्या चिठ्ठीत तिने लिहिलं आहे की, “नंदेच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे.” ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून, अधिक तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. या आत्महत्येमागील नेमकी कारणे काय आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही दुर्दैवी घटना परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महिला आणि लहानग्याच्या अशा प्रकारे जाण्याने समाजमन सुन्न झालं आहे.