इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
धायरी (पुणे): धायरी परिसरातील ‘श्री ज्वेलर्स’ने नागरिकांना सुवर्णभिशी योजनेचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दुकानाचे मालक विष्णू सखाराम दहिवाळ आणि त्यांची पत्नी स्वाती हे दोघेही सध्या फरार आहेत. धायरीतील रासकरमळा परिसरात दहिवाळ दांपत्य ‘श्री ज्वेलर्स’ या नावाने दुकान चालवत होते. त्यांनी आकर्षक परतावा देणारी सुवर्ण भिशी योजना सुरू केली होती, ज्यावर विश्वास ठेवून अनेक सामान्य नागरिकांनी कष्टाची कमाई गुंतवली. मात्र, सोन्याचे वितरण किंवा पैसे परत करण्याच्या ठरलेल्या वेळी गुंतवणूकदारांना निराशाच पदरी पडली.
नन्हे येथील एका तक्रारदाराने ९ जून रोजी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारदाराने आणि त्यांच्या पत्नीने मिळून जवळपास ३.३९ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. २५ मे रोजी सोने घेण्यासाठी ते दुकानात गेले असता, दुकान बंद असल्याचे त्यांना आढळले. चौकशी केल्यानंतर दहिवाळ दांपत्य फरार झाल्याचे समोर आले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, केवळ एक-दोन नव्हे तर तब्बल ३६ गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. दहिवाळ दांपत्य एकूण ४२ लाख ७८ हजार रुपये आणि सुमारे २१ तोळे सोन्याचे दागिने घेऊन फरार झाले आहे. नांदेड सिटी पोलिसांनी त्यांच्या विरोधात महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस आणि गुन्हे विभागाचे निरीक्षक गुरूदत्त मोरे करत आहेत.