इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : हनीट्रॅपमध्ये अडकवून एका ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या टोळीत पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ मारुती उभे (वय ५५) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हनीट्रॅपमध्ये अडकवून ज्येष्ठाला लुटल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अवंतिका सचिन सोनवणे (वय-३५), पूनम संजय पाटील (वय-४०), आरती संजय गायकवाड (वय-५८, तिघी रा. कोथरुड) यांना अटक करण्यात आली आहे.
पूनम पाटीलविरुद्ध कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका डॉक्टरला ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या टोळीने अनेक नागरिकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटल्याचा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान, कोथरुड परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून महिलेने एका हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर पोलीस आणि महिला हक्क आयोगाचे सदस्य असल्याचे सांगून ज्येष्ठाला मारहाण केली. तसेच बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी मागितली.
त्याच्याकडील २० हजारांची रोकड मोबाइल संच काढून घेतले. ही घटना २९ जुलै रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास लक्ष्मी रोडवरील एका हॉटेलमध्ये घडली होती. ६४ वर्षीय नागरिकाने दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात ३ महिलांसह एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे हे करत होते. ज्या लॉजवर हा प्रकार घडला तेथील रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी लक्ष्मी रस्त्यावरील हॉटेलमध्ये महिलेच्या आधारकार्डची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून अवंतिका सोनवणेसह, पूनम पाटील, आरती गायकवाड यांना ताब्यात घेतले.
सीसीटीव्हीमध्ये गुन्ह्यात वापरलेली एक मोटार आढळून आली. तेव्हा मोटार मुळशीतील एकाच्या नावावर असल्याचे समजले. चौकशीत मोटारीचा वापर पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ उभे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी उभे याला ताब्यात घेतले असून उभे या कटात सामील असल्याचे समोर आले आहे. हॉटेलच्या खोलीत महिला हक्क आयोगाचा सदस्य असल्याचे सांगून प्रवेश करणाऱ्या महिलांसोबत उभे असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली.