इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामती : बारामतीमध्ये एका अल्पवयीन आरोपीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या वाढदिवसाचे सामान घेऊन जाताना जुन्या भांडणाच्या वादातून टोळक्याने एका अल्पवयीन आरोपीचा खून केला आहे. ही घटना बुधवारी (दि. २१) रात्री बारामती तालुक्यातील जळोची येथे घडली आहे. गणेश धुळाबापु वाघमोडे (वय १७, रा. जळोची, बारामती) असं खून झालेल्या अल्पवयीन गुन्हेगार मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे शहर व परिसरात गैंगवॉर पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येथ आहे.
याबाबत फिर्यादी नवनाथ उत्तम चोरमले (वय-३९, धंदा फोटो ग्राफर, रा. अहिल्यादेवी चौक जळोची, ता. बारामती, जि. पुणे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून जयेश बाळासाहेब माने, शुभम गायकवाड, करण जाधव, अविष गरुड, सोमनाथ जाधव व भोल्या (पूर्ण नाव, पत्ते नाहीत) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश वाघमोडे व आरोपींची गतवर्षी टी. सी. कॉलेजजवळ भांडणे झाली होती. दरम्यान, स्वतःच्या वाढदिवसासाठी साहित्य खरेदी करून गणेश हा बुधवारी घरी निघाला होता. त्यावेळी इनोव्हा गाडीतून आलेल्या या सहा जणांनी फिर्यादीचा भाचा गणेश वाघमोडे याला धारदार शस्त्राने डोक्यात, मानेवर व इतरत्र वार करून त्याचा खून केला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
गणेश वाघमोडे सराईत गुन्हेगार
अल्पवयीन गणेश वाघमोडे याच्यावर बारामतीमध्ये यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०२२ मध्ये त्याच्यावर खुनाचा, २०२३ मध्ये खुनाच्या प्रयत्नासह शस्त्र अधिनियम तसेच शस्त्रांसह जमाव जमवून मारहाण, गंभीर मारहाण असे चार गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.
दोन वर्षांपूर्वी कारंडेचा निघृण खून
दोन वर्षांपूर्वी १८ ऑगस्ट रोजी गणेश वाघमोडे व त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी बारामतीत शशिकांत बाबासो कारंडे यांचा खून केला होता. कारंडे यांचा मुलगा व इतर अल्पवयीनांमध्ये एका मैत्रिणीशी बोलण्यावरून वाद झाला होता. त्या वादात शशिकांत यांनी मध्यस्थी करत या तरुणांची समजूत घालत त्यांना वडिलकीच्या नात्याने समजावले होते. त्याचा राग मनात धरत परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तिघा अल्पवयीनांनी कारंडे यांचा धारदार शस्त्राने निघृण खून केला होता. त्यानंतर आता बरोबर दोन वर्षांनी गणेश याचा खून झाला.