इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
भूवनेश्वर : अगदी तीन-चार वर्षांच्या मुलांपासून पंचविशीतीलयुवकांना मोबाईलचे अक्षरशः व्यसन लागल्याचे आपण पाहतो. अशा मुलांना मोबाईलच्या या वेडापायी मानसिक आजाराची लागण झाल्याच्या, तर मोबाईल न दिल्यामुळे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना आपण पाहिल्या, ऐकल्या आहेत. ओडिशात तर यापेक्षाही भयंकर प्रकार समोर आला आहे. मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळू न दिल्यामुळे एका युवकाने आई-वडील आणि बहिणीची निघृण हत्या केल्याची घटना घडली आहे.
ओडिशाच्या जगतसिंहपुर शहरातील जयबाडा सेठी साही परिसरातील ही घटना आहे. पोलीस अधीक्षक भवानी शंकर उद्गाता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ३ वाजता आरोपी युवकाने दगड किंवा एखाद्या कठीण वस्तूने त्याचे आई-वडील आणि बहिणीच्या डोक्यावर वार केले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. सूर्यकांत सेठी (वय २१ वर्षे) असे आरोपी युवकाचे नाव आहे. त्याने वडील प्रशांत सेठी (६५), आई कनकलता (६२) आणि बहीण रोझलिन (२५) यांची हत्या केली. हत्येनंतर सूर्यकांत जवळच्या गावात लपला होता.
पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत त्याला अटक केली. प्राथमिक तपासानुसार सतत मोबाईलवर ऑनलाईन गेम्स खेळणाऱ्या सूर्यकांतला त्यांचे पालक सतत रागवायचे. घटनेच्या दिवशी देखील सूर्यकांतला त्याचे आई-वडील, बहिणीने मोबाईल गेम खेळण्यापासून रोखत फटकारले होते. याचा राग मनात धरून सूर्यकांतने रात्री ते झोपेत असतानाच त्यांची हत्या केली. प्रशांत यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. सूर्यकांत हा सर्वात धाकटा मुलगा आहे. या कुटुंबातील मोठा मुलगा उमाकांतने दिलेल्या माहितीनुसार सूर्यकांतची मानसिक स्थिती बरी नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.