इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. पुण्यातील बिबवेवाडी भागात सोमवारी (3 मार्च) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यानंतर अपहरण झालेल्या हिरे व्यापाऱ्याच्या पत्नीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बिबवेवाडी भागात हिरे व्यापारी एका सोसायटीत वास्तव्यास आहेत. हिरेजडीत दागिने बनवण्याचे त्यांचे काम आहे. (3 मार्च) ला सोमवारी सायंकाळी व्यापारी व त्यांची पत्नी मुलीला शाळेतून आणण्यासाठी सॅलिसबरी पार्क परिसरात गेले होते. त्यानंतर त्यांनी शाळेतून मुलीला घेऊन नंतर दोधिंनाही घरी सोडले. तिथून ते काही कामानिमित्त छावणी परिसरात जाणार असल्याचे पत्नीला सांगितले.
अधिक माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास व्यापाऱ्याच्या पत्नीच्या मोबाईलवर एक कॉल आला. “मैने आपके पति को उठाया है, दो करोड तयार रखो, आपके ससुर जी को बोलो, दो घंटे मे फोन करेंगे” असे अनोळखी व्यक्ती म्हणत होता. असे म्हणत त्याने फोनवर जिवेमारण्याची धमकी दिली. व्यापाऱ्याच्य पत्नीने पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, निखिल पिंगळे, विवेक मासाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
तपासादरम्यान, पोलिसांनी केलेल्या तांत्रिक माहितीच्या विश्लेषणानुसार व्यापारी सोमवारी सायंकाळी नवले पूल परिसरात असल्याचे आढळून आले. नवले पूल परिसरात व्यापाऱ्याची दुचाकी सापडली आहे. या व्यापाऱ्याने काही जणांकडून पैसे घेतले होते अशी माहिती समोर आल्यानंतर अपहरण प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. बरोबरच आर्थिक वादातून अपहरण करण्यात आल्याची प्राथमिक शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.