इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः देशातील पहिला थ्रीडी प्रिंटेड बंगला उभा राहिला आहे, तोही पुण्यात. मद्रास आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या डीप-टेक स्टार्ट-अप ट्वास्टाने हा थ्रीडी प्रिंटेड बांधकाम प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. पुण्यातील गोदरेज ईडन इस्टेट्स येथे चार महिन्यांच्या कालावधीत जी प्लस १ असा २.२०० चौरस फुटांचा बंगला जागेवरच बांधण्यात आला आहे.
२०१६ मध्ये आयआयटी मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी चेन्नईत ट्वास्टा हा स्टार्टअप स्थापन केला. या स्टार्टअपकडून जलद, पर्यावरणपूरक बांधकाम तंत्रासाठी रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा वापर केला जातो. ट्वास्टाचे सह-संस्थापक आणि सीओओ परिवर्तन रेड्डी म्हणाले की, नमुनेदार भिंती आणि जटिल वास्तुशिल्पीय आकार यासारख्या नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांद्वारे, ट्वास्टाने पारंपरिक इमारतीच्या डिझाईनच्या सीमा ओलांडल्या आहेत. आम्ही हे तंत्रज्ञान आणखी विकसित करत आहोत.
४ महिन्यांत २,२०० चौरस फुटांचा बंगला तयार
काय आहे थीडी-प्रिंटिंग?
कन्स्ट्रक्शन ३-डी प्रिंटिंग हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, जे विशिष्ट कच्च्या मालासह थ्रीडी प्रिंटरने एकत्रित बांधकामाची निर्मिती करते. या पद्धतीमध्ये मजल्यानुरूप पूर्णस्तरीय बांधकामाची उभारणी करता येते. यामुळे पारंपरिक बांधकाम पद्धतीपेक्षा प्रकल्प पूर्ण होण्यास खूपच कमी वेळ लागतो. करते
वैशिष्ट्यपूर्ण रचना
ट्वास्टा स्टार्टअप बांधकाम आणि इतर क्षेत्रातील कचऱ्याचा पुनर्वापर देखील करते. ट्वास्टाच्या मते, थ्रीडी प्रिंटेड भिंतीमध्ये अशी रचना आहे, जी सुधारित इन्सुलेशन प्रदान करते. कमी ऊर्जा वापरते आणि उपयुक्तता खर्च कमी करते. या प्रकल्पात वापरल्या गेलेल्या थ्रीडी प्रिंटिंग प्रक्रियेमुळे कचरा आणि पर्यावरणावरील परिणाम कमी तर होतीलच, शिवाय अचूकता आणि गुंतागुंतीचे तपशील तयार करणेही शक्य होईल. यामुळे बांधकाम क्षेत्रातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या वाढत्या टंचाईवरही मात करणे शक्य होणार आहे.