इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यामध्ये मोबाइलवर संभाषण करत निघालेल्या दुचाकीस्वाराला हटकल्याने त्याने वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराच्या डोक्यात दगड घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसरमधील फुरसुंगी परिसरात ही घटना घडली. पोलिसांकडून पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात येत आहे. राजेश गणपत नाईक (वय ४७) असे जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. नाईक यांच्यावर रुग्णालयात प्रथोपचार करण्यात आले आहेत. याबाबत नाईक यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार नाईक फुरसुंगी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फुरसुंगी परिसरातील भेकराईनगर भागात नाईक वाहतूक नियमन करत होते. त्या वेळी दुचाकीस्वार मोबाइलवर संभाषण करत भरधाव वेगाने निघाला होता. नाईक यांनी त्याला समज दिली असता त्यावेळी दुचाकीस्वाराने नाईक यांच्याशी वाद घातला.
तसेच रस्त्यात पडलेला दगड उचलून थेट नाईक यांच्या डोक्यात दगड घेतला आणि दुचाकीस्वार पसार झाला. यामध्ये नाईक जखमी झाले. जखमी अवस्थेतील नाईक यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत.