इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दिल्ली : दिल्ली विधानसभा मतदानाला सुरवात होण्यापूर्वी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला (मंगळवारी) केजरीवाल यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. कुरुक्षेत्रच्या शाहाबाद पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. हरियाणा सरकारवर याबाबत केजरीवाल यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी, आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर ही कारवाई केल्याने आप आमदी पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती शहाबाद पोलिस ठाण्याचे अधिकारी सतीश कुमार यांनी दिली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना भडकावल्याचा आणि दोन राज्यातील लोकांमध्ये चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. अॅड. जगमोहन मनचंदा यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या इतर सदस्यांविरुद्ध हरियाणामध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे.
“कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धेचे प्रतीक यमुना नदी आहे. केजरीवाल यांच्या विधानाने जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीकडून केल्या गेलेल्या अशा निराधार आणि अपमानास्पद वक्तव्यामुळे आंतरराज्य सौहार्द कमकुवत होण्याबरोबर सरकारी संस्थांवरील जनतेचा विश्वासही कमी होतो,” असे जगमोहन मनचंदा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते केजरीवाल?
दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता आहे. दिल्लीतील लोक मरावेत आणि दोष ‘आप’वर यावा यासाठी दिल्लीत अराजकता निर्माण करण्यासाठी हे केले करण्यात आले आहे. हरियाणा सरकारने दिल्लीचे पाणी विषारी बनवले आहे. दिल्ली जल बोर्डाने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखले. भाजप सरकारने पाण्यात इतके विष मिसळले आहे की ते जलशुद्धीकरण केंद्रांनीही स्वच्छ करता येणार नाही.