इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामती/भवानीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातील मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची साथ सोडा, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे काटेवाडी (ता. बारामती) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील आंदोलकांवरील हल्ल्याचा निषेध करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तैलचित्रावर फुल्या मारून राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काटेवाडी येथील बारामती-इंदापूर रस्त्यावरील बसस्थानक परिसरात ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत काटेवाडी ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने बारामतीत ‘रास्ता रोको आंदोलन करण्यात आले… यावेळी काटेवाडी सोसायटीचे अध्यक्ष स्वप्निल काटे म्हणाले, जालना येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व मराठा समाजाच्या वतीने येथे जमलो होतो.
या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवर फुल्या मारण्याचे निश्चित करण्यात आले; मात्र या वेळी अजित पवार फोटो का नव्हता, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर जालना येथील घटनेला सर्वस्वी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो झळकवत ते जबाबदार आहेत, असे त्यांनी सांगितले. ‘आम्ही समस्त काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने अजित पवार यांना एकच विनंती करतो, त्यांनी एकतर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची साथ तरी सोडावी. आम्ही सकल मराठा समाज तुमच्याकडे खूप अपेक्षेने पाहत आहोत,’ असे स्पष्ट मत त्यांनी या वेळी मांडले.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे म्हणाले, ‘आमचा पोलिसांवर रोष नाही. वरिष्ठांच्या आदेशाने त्यांनी हे कृत्य केले. मात्र, त्यांना आदेश देणाऱ्या वरिष्ठांविषयी आमचा राग आहे. मागील सात वर्षांमध्ये राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले. मात्र, कसलाही अनुचित प्रकार त्या वेळी घडला नाही. शांततेच्या मार्गाने सुरू असणारे हे आंदोलन दडपण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. सरकारने पोलिस बळाचा वापर करून अमानुषपणे केलेला लाठीहल्ला हा मराठा समाजाच्या भावना दुखवणारा आहे.’
बाजार समितीचे माजी अध्यक्ष संजय काटे, बाळासाहेब शिंदे, स्वप्निल काटे, अपंग सेलचे तालुकाध्यक्ष, जाधव, रमेश काटे यांनी मनोगत व्यक्त करत सरकारचा निषेध केला. या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक पोलिस निरिक्षक राहुल घुगे यांना निवेदन देण्यात आले.