इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा आजपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे. यावर्षी १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्येमध्ये दोन हजारांनी वाढ झाली आहे. याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली.
परीक्षेसाठी २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांतून नोंदणी केलेल्या १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७लाख ४७ हजार ४७१ मुली आणि १९ तृतीयपंथी आहेत. राज्यभरातील ५ हजार १३० मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. काही अपरिहार्य कारणांस्तव विद्यार्थी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, प्रकल्प परीक्षा देऊ न शकल्यास संबंधित विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर १८ ते २० मार्च या कालावधीत परीक्षेची संधी देण्यात येणार आहे.
अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे..
गोसावी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता, तर दुपारच्या सत्रात २.३० वाजता परीक्षा कक्षात उपस्थित असले पाहिजे. मंडळाने प्रसिद्ध तसेच छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरण्यात यावे. अन्य संकेतस्थळ किंवा यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.’ असेही गोसावी म्हणाले.
कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी होणार
‘परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळातर्फे २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. गैरप्रकारांना उद्यद्युक्त करणारे, मदत करणारे, गैरप्रकार करणारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.’ असे शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.