इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : वाढता उन्हाळा आणि कामगारांची कमतरता यामुळे पुणे पालिकेच्या मिळकत कर विभागाला दररोजची १० कोटी रुपयांची वसुली करताना दमछाक होत आहे. मिळकत कर थकविलेल्या मिळकतीवर पालिकेकडून आता थेट जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. त्याच वेळी अंदाजपत्रकातील उद्दिष्ट गाठण्यासाठी आता दररोज १० कोटी रुपयांपर्यंतचा मिळकत कर वसूल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. कर आकारणी आणि संकलन विभागाची सध्या दररोज बैठक होत आहे. ३१ मार्चपूर्वी जास्तीत जास्त मिळकत कर वसुलीवर भर देण्यात आला आहे.
विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी मिळकत कर आकारणीसंदर्भात सूचना केल्या होत्या. कर आकारणी व संकलन विभागाने २०२४-२५ या वर्षासाठी समाविष्ट ३४ गावांसमवेत मिळकत करातून सुमारे २८०० कोटी रुपयांचे उप्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत मिळकत कर विभागाने दोन हजार कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता एक महिना शिल्लक राहिला आहे. उर्वरित मिळकत कर गोळा करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, समाविष्ट गावांतील थकबाकी वसूल करण्यास स्थागिती दिली आहे.