इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात येत असलेली दप्तर तपासणी ही सेस चोरी उघड करण्यासाठी, सेस वाढविण्यासाठी की हप्ते गोळा करण्यासाठी असल्याचा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे व भाजीपाला विभागातील काही आडत्यांची दप्तर तपासणी प्रशासनाने केली आहे. याबाबत या मोहिमेचे शेतकऱ्यांसह बाजार घटकांनी कौतुक केले आहे. मात्र, ठराविक आडत्यांचीच तपासणी का ? असा सवाल उपस्थित करत आडत्यांची सरसकट दप्तर तपासणी व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
याबाबत राजू शेट्टी म्हणाले की, बाजार समितीमध्ये मर्जी न राखणाऱ्या आडत्यांची तपासणी केली जात आहे. तर मर्जीतल्या आडत्यांना या सेसमधून वगळले जात आहे. त्यामुळे सरसकट दप्तर तपासणी केल्यास कोणी किती सेस चोरला, शेतकऱ्यांची किती लुट झाली हे वास्तव समोर येईल. त्यामुळे बाजार समितीने कोणताही मुलाहिजा न राखता सर्वांची सरसकट दप्तर तपासणी केल्यास सत्य बाहेर येईल.