इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : हडपसर परिसरातील फुरसुंगी येथील एका व्यक्तीचा खून करुन गेली चार वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने अटक केली आहे. शुभम शरद कांबळे (वय-२३) आणि आनंद नागेश माने (वय-२४, दोघे रा. लक्ष्मी कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरात बसवराज कांबळे (रा. गंगानगर, फुरसुंगी) याचा चार वर्षापूर्वी हेमंत रमेश नाईकनवरे व त्याच्या साथीदारांनी खून केला होता. हेमंत नाईक नवरे याच्यासह त्याचे इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, तेव्हापासून शुभम कांबळे आणि आनंद माने हे पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव करीत होते.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकातील पोलीस अंमलदार विनोद शिवले, अकबर शेख, अमित कांबळे यांना हे दोघे गंगानगर स्मशानभूमी परिसरात थांबले असल्याची माहिती २८ सप्टेबर रोजी मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन दोन्ही गुंडाना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यांना हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार विनोद शिवले, अकबर शेख, राजस शेख, प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, अमित कांबळे, उमाकांत स्वामी, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, पृथ्वीराज पांडुळे, विनोद निंभोरे, संजयकुमार दळवी, शुभांगी म्हाळशेकर, स्वाती गावडे यांनी केली आहे.