इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दौंड : दौंड तालुक्यात दुचाकीला पाठीमागून हुंडाई कंपनीच्या चारचाकी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना पाटस कानगाव रोडवर पाटस येथील पळसे पुर्नवसन डी. पी. जवळ घडली होती. दरम्यान, पाटस पोलिसांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पाटस पोलीसांनी दिली आहे. अक्षय बबन कोळेकर, सुरज विजय पवार (दोघेही रा. पाटस, ता. दौंड जि पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोंबर २०२४ रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास पाटस- कानगाव रोडवर पळसे पुर्नवसन डी. पी. जवळ वैभव दिवेकर (रा. पाटस) हा पाटस बाजूकडून कानगाव बाजूकडे दुचाकी (नं. एम. एच.४२ सी.९८४३) वरुन घरी जात होता. पाठीमागुन आलेली ग्रे रंगाची हुंडाई कंपनीची व्हेन्यू मॉडेलची नंबर नसलेल्या चारचाकी कारने भरधाव वेगात मोटार सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात वैभव गंभीर जखमी झाला होता.
या घटनेनंतर चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. याबाबत पाटस पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला होता. मात्र, पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख यांना अपघाताची शंका आली आणि त्यांनी तपासाची चक्रे फिरवली.
वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यासंदर्भात कल्पना देऊन तात्रिंक विश्लेषन व सीसीटीव्हीची तपासणी करून गोपनीय माहीती घेऊन अपघाताची सखोल चौकशी केली असता, हा अपघात नसून अपघाताचा बनाव करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले.
त्यानंतर अक्षय चव्हाण याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने वैभव दिवेकरला चारचाकी गाडीने धडक देऊन जिवे ठार मारण्यासाठी अक्षय बबन कोळेकर (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) याने मला तसेच तुषार चोरमले, सुरज विजय पवार (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) व लाला पाटील (रा. भिगवण ता. इंदापुर, जि. पुणे) या चार जणांना ५ लाख रूपयाची सुपारी दिली असल्याची कबुली दिली. या प्रकरणी पाटस पोलीसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास पाटस पोलीस करत आहेत.