इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात शाळकरी मुलीने गावातील तरूणाच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी तरुणाने दिल्याने को-हाळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. गेल्या अनेक महिन्यापासून या मुलीला गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे त्याचे साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे पाठलाग करून मानसिक त्रास, मेसेज वर धमक्या देत होता. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी देत चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात भीती निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटीला मयत मुलगी कंटाळली होती. या आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०७,७८,२९६,३५२, ३५१ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.