इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्याने एका तरुणाला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. हि घटना शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. ओम सुनील भालेराव (वय-१८) असं चारचाकीने उडवल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
दरम्यान, अपघाताच्या दहा मिनिटे आधी आजोबांनी आणि त्याच्या वडिलांनी ओमला जेवणासाठी फोन केला होता. तेव्हा ओम म्हणाला, तुम्ही जेवायला बसा मी आलोच… त्यानंतर पुढच्या दहा मिनिटात ओमच्या अपघाताची बातमी कुटुंबाला मिळाली अन् त्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
आंबेगाव तालुक्यातील कळंबमध्ये भालेराव कुटुंब राहण्यास असून ते शेती करतात. ओम हा त्याच्या आई वडिलांना एकुलता एक असून घरातील सर्वांचा लाडका होता. बारावी झाल्यानंतर त्याने पुढील शिक्षण न घेता आपला मोर्चा शेतीकडे वळवला होता. गेल्या वर्षीच शाळा सोडून तो व्यवसायाकडे वळला होता. ट्रॅक्टरचा व्यवसाय तो करत असून त्याला अजून एक ट्रॅक्टर घेण्याची इच्छा होती.
नेमकं काय घडलं?
आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर मोहिते हा कारने कळंबकडून मंचरच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी ओम भालेराव हा दुचाकीवरून कळंबच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, तो मंचरमध्ये असताना वडिलांनी त्याला जेवणासाठी फोन केला होता. त्यावेळी मी दहा मिनिटात आलो असे सांगून त्याने फोन ठेवला.
मात्र, बराच वेळ होऊन गेला तरी, ओम आला नाही. त्यामुळे त्याच्या आजोबांनी त्याला फोन केला. त्यावर तो म्हणाला, तुम्ही जेवायला बसा, मी लगेच येतो, असं सांगितल्यानंतर आजोबांनी फोन बंद केला. घरातले जेवायला बसले असतानाच अवघ्या १० मिनिटाच्या कालावधीतच ओमच्या मृत्यूची बातमी भालेराव कुटुंबाला समजली. त्यांना काय करावे, सुचेनासे झाले. मात्र, सत्य स्वीकारण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ओमच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेले असून त्याच्या आठवणीने व्याकूळ झाले आहे.