इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबईः राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह इतर मंत्र्यांना ‘एकदा-दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, मात्र तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही, तर मंत्रिपद बदलू’, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. राज्यातील संवेदनशील विषयावर सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करून राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर पवार नाराज असल्याचे समजते.
एकीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांवर आरोप झाल्याने पक्षाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. याच प्रकरणात धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्या आरोपांतून पक्ष काहीसा सावरतोय तोच दुसरीकडे मंत्री कोकाटे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त विधाने करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम होत आहे. त्याचसोबत राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबाराला दांडी मारणे आणि पक्षाच्या मंगळवारी होणाऱ्या नियोजित बैठकीमध्ये अर्धा तास ऊशिरा येण्याच्या मुद्द्यावरून पवार यांनी कोकाटे यांना झापल्याचे समजते.