इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : रस्ते अपघातात जीव गमाविलेल्या एका मुलीमुळे सहा जणांना जीवदान मिळाले आहे. नारायणगाव येथे झालेल्या अपघातात ही मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला मेंदूमृत घोषित करण्यात आल्यानंतर तिच्या पालकांकडून अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला. तिचे अवयव सहा जणांना प्रत्यारोपित करण्यात आले आहेत. त्यामुळे सहा जणांना जीवदान मिळाले आहे.
आँचल शिंदे असे अपघातात जीव गमाविलेल्या मुलीचे नाव असून तिने २५ जानेवारीला तिचा १७ वा वाढदिवस साजरा केला होता. नारायणगाव येथे झालेल्या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती बिघडल्याने तिला बाणेरमधील मणिपाल रुग्णालयात हलविण्यात आले होते. डॉक्टरांनी तिचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यात यश आले नाही. डॉक्टरांनी अखेर तिला मेंदूमृत घोषित केले. मुलीच्या जाण्याच्या दुःखातही तिच्या पालकांकडून अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला.
विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडून आँचल शिंदे या मुलीच्या अवयवदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. या मुलीचे एक मूत्रपिंड मणिपाल रुग्णालयातील ३९ वर्षीय महिलेला, एक मूत्रपिंड व स्वादुपिंड ज्युपिटर रुग्णालयातील ३७ वर्षीय महिलेला, यकृताचा एक भाग सह्याद्री रुग्णालयातील ५ वर्षीय मुलाला तर दुसरा भाग सह्याद्री रुग्णालयातील ४३ वर्षीय पुरुषाला आणि फुफ्फुसे डी. वाय. पाटील रुग्णालयातील ३३ वर्षीय पुरुषाला देण्यात आला, अशी माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या सचिव आरती गोखले यांनी दिली.
आमची मुलगी गेली असली तरी तिचे जाणे व्यर्थ ठरू नये, यासाठी आम्ही अवयवदानाचा निर्णय घेतला. तिच्या अवयवांच्या माध्यमातून ती आता इतरांमध्ये जिवंत आहे. आमच्याप्रमाणे इतर पालकांनी अशा प्रसंगी अवयवदानाचा निर्णय घेऊन इतरांना जीवदान द्यावे.
वर्षा व रवींद्र शिंदे, आँचलचे पालक