इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर : घरातील सर्व मंडळी बाहेरगावी गेल्याची संधीसाधून चोरट्याने बंगला फोडून तिजोरीमधील सुमारे 28 लाखांच्या सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना तरडे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे कोलस वस्ती परिसरात घडली असून शनिवारी (ता. 1) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घरफोडीची पूर्व हवेलीत सर्वत्र चर्चा असून तरडे येथील सर्वात मोठी चोरी झाली आहे. अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.
याप्रकरणी स्टीफनविक्टर वलेरवण लासराडो (वय 51, रा. प्लॉट नं. 524, रेल्वे कोलस वस्ती रोड, तरडे ता हवेली जि- पुणे, मुळ रा बिल्डींग नं 150, फ्लॅट नं.4 डी.4 था मजला रोड नं 1 ब्लॉक नं 3. अलअमादी गर्व्हर्नरेट, देश कवेत) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (1), 331 (4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्टीफनविक्टर लासराडो यांचा तरडे परिसरात बंगला आहे. फिर्यादी हे बुधवारी (ता.29) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कुटुंबासोबत बाहेरगावी गेले होते. ते शनिवारी (ता. 1) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरी आले. तेव्हा फिर्यादी यांना घराचे लॉक तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. आणि घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्वरित घरात जाऊन पाहणी केली असता, मास्टर बेडरुममधील बेडच्या फरशीचे खाली खड्डा खादुन तयार करण्यात आलेल्या तिजोरीमधील स्टिलच्या डब्यातील सोन्या चांदीचे दागिने आढळून आले नाही.
दरम्यान, अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घरातील सुमारे 30 तोळे सोन्याचे दागिने व 4 किलो 200 ग्रॅम चांदीची बिस्किटे, असा एकूण चालू बाजारभावाप्रमाणे 28 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या सोन्याच्या दागिन्यांमध्ये हार, अंगठी, नेकलेस, चैन व बांगडी या दागिन्यांचा समावेश आहे. घरात चोरी झाल्याचे लक्षात झाल्यानंतर फिर्यादी स्टीफनविक्टर लासराडो ठाणे गाठले. आणि अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत.