इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोरः महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी रोजी सर्व भारतीय शहीद दिन पाळतात. या दिवशी ड्राय डे असल्याने कोठेही मद्यविक्री करता येत नाही. मात्र, ड्राय डे असल्याचा फायदा घेऊन बेकायदेशीररीत्या देशी-विदेशी दारूची चढ्या दामाने विक्री करणाऱ्याला लोणी काळभोर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई पोलिसांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वीरे दा ढाब्याच्या पाठीमागे शुक्रवारी (ता.30) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास केली आहे.
सागर बसवराज सोनकटले (वय 22, पठारेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे. मुळ रा. मु.पो. अशलर, ता.लोहारा, जि. धाराशीव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चक्रधर शिरगीरे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ड्राय डे’च्या दिवशी जर कोणी अवैधरित्या दारूची विक्री करीत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांना दिले होते. मिळालेल्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलिसांचे तपास पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.
गस्त घालत असताना, पोलिसांच्या पथकातील पोलीस अंमलदार चक्रधर शिरगीरे यांना एक इसम कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वीरे दा ढाब्याच्या पाठीमागे बेकायदा देशी-विदेशी दारूची विक्री करीत आहे, अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा आरोपी सागर सोनकटले हा अवैध दारूची विक्री करताना आढळून आला.
पोलिसांनी या कारवाईत दोन हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. तर आरोपी सागर सोनकटले याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस अंमलदार चक्रधर शिरगिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.