Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजड्युटी संपली अन् ड्रायव्हर रेल्वे फलाटावर लावून घरी गेलाः पुण्याच्या यवत रेल्वे...

ड्युटी संपली अन् ड्रायव्हर रेल्वे फलाटावर लावून घरी गेलाः पुण्याच्या यवत रेल्वे स्थानकावरील प्रकार; प्रवाशांसह खासदाराचा संताप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

ड्युटी संपल्यामुळे रेल्वे फलाटावर सोडून ड्रायव्हर घरी गेल्याची अजब घटना पुण्याच्या यवत रेल्वे स्थानकावर घडली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा एक व्हिडिओ शेअर करत प्रवाशांना झालेल्या नाहक त्रासाची कैफियत मांडली आहे.

पुण्याच्या यवत रेल्वे स्थानकावर 2 फलाट आहेत. या दोन्ही फलाटावर सोमवारी रात्री 2 मालगाड्या उभ्या होत्या. यामुळे डेमू रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या दोन्ही रेल्वेगाड्या ओलांडून फलाटावर जावे लागले. यामुळे महिला, मुले व वृद्ध प्रवाशांचे मोठे हाल झाले. सुदैवाने यावेळी कोणतीही मालगाडी चालू न झाल्यामुळे एखादी दुर्घटना घडली नाही. या प्रकरणी प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोमवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रवाशांनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रवाशांनी केली लेखी तक्रार

‘पुणे – बारामती डेमू रेल्वेने आम्ही अनेकजण यवत-पुणे रोज प्रवास करतो. आज पुण्याहून यवत येथे आलेली आमची गाडी फलाटावर न थांबवता मुख्य मार्गिकेवरच थांबवली. त्यामुळे पायऱ्या नसलेल्या डेमूच्या बोगीतून उतरणे व दोन्ही बाजूंच्या फलाटालगत असलेल्य मालगाड्या ओलांडून फलाटावर जाण्यासाठी प्रवाशांना खुपच कसरत करावी लागली. आम्ही 20-25 पासधारकांनी यवतच्या स्टेशन मास्तरांकडे लेखी तक्रार केली. तेव्हा मालगाडीचा चालक ड्युटी टाइम संपला असे म्हणून गाडी सोडून गेला’, असे एका प्रवाशाने याविषयी सांगितले.

सुप्रिया सुळेंनी शेअर केला व्हिडिओ

दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील यवत रेल्वे स्थानकाच्या दोन्ही फलाटांवर मालगाड्या उभ्या असल्यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीवावर उदार होत रुळ ओलांडून फलाटावर यावे लागले. हा प्रसंग रात्री घडला, त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुले मालगाडीला वळसा घालून येईपर्यंत मेटाकुटीला आली होती. रेल्वे ड्राईव्हरची ड्युटी संपली म्हणून तो फलाटावरच गाडी लावून गेला असे बेजबाबदार उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. परंतु तरीही अशा पद्धतीच्या घटना घडणे हे चुकीचे आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव यांना विनंती आहे की, या प्रकरणाची चौकशी करुन अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये याबाबतच्या सुचना संबंधितांना द्याव्या, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

रेल्वे प्रवाशात प्रवाशांना अनेकदा लहानमोठ्या अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो. कधी कधी ट्रेन वेळेपेक्षा अधिक लेट झाल्याने, तर कधी रेल्वेच्या कँटीनमधून आलेल्या जेवणाचा दर्जा घसरल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments