Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजडॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा? दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर येणार...

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा? दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर येणार निकाल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल आज (ता. १०) जाहीर करण्यात येणार आहे. या खटल्यात पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली असून हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली निघत आहे.

2013 मध्ये झाली होती हत्या

68 वर्षीय नरेंद्र दाभोलकर 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी फिरायला गेले होते. पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. त्यानंतर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवून गोळ्या झाडल्या होत्या. सुरुवातील पुणे पोलिस, त्यानंतर एसटीस आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या सर्व हत्या प्रकरणांचा तपास केला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरु होती. त्यानंतर न्यायाधीश नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अॅड. सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी दोन साक्षीदार न्यायालयात हजर केले होते.

या कलमांनुसार आरोपी निश्चिती

तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३०२ (हत्या), १२० (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

कर्नाटक पोलिसांनी उलगडला हत्येचा कट

बंगळूरमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या खुनाप्रकारणी कर्नाटक एटीएसने चिंचवडहून अमोल काळे याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून नालासोपारा येथील वैभव राऊत याचे धागेदोरे मिळाले. त्याच्या घरातून पोलिसांनी शस्त्रांचा आणि स्फोटकांचा साठा जप्त केला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे पोलिसांनी शरद कळसकरला अटक केली. त्याने सचिन अंदुरेच्या मदतीने डॉ. दाभोलकर यांचा खून केल्याची कबुली दिली आहे.

नरेंद्र दाभोलकर कोण होते?

डॉ नरेंद्र अच्युत दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला. एमबीबीएस झाल्यानंतर डॉक्टर होण्याऐवजी त्यांनी सामाजिक कार्यात झोकून दिले. 1982 पासून ते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत पूर्णपणे गुंतले होते. 1989 मध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. ही संस्था कोणत्याही प्रकारच्या सरकारी किंवा परदेशी मदतीशिवाय काम करते. अनेक कट्टर उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी त्यांना हिंदूविरोधी मानले. कर्नाटकात गोविंद पानसरे आणि प्राध्यापक एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांची हत्या झाली.

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची अशी झाली सुरुवात

1987 साली त्यांनी शाम मानव यांच्यासोबत अखिल भारतीय अंनिसच्या कामास सुरुवात केली आणि नंतर 1989 साली वेगळे होऊन त्यांनी मुठभर कार्यकर्त्यांच्या समवेत ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची स्थापना केली. आणि इथून खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्यांच्या सामाजिक संघर्षाला सुरुवात झाली. मअंनिसच्या संघटनात्मक वाटचालित अनेक सामाजिक विषयांना टक्कर देताना त्यांच्या पुढाकाराने अनेक मोहिमा राबवल्या गेल्या.

1992 साली मुंबईत ‘स्त्रीया आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ परिषद व ‘शोध भुताचा, बोध मनाचा’ या विषयावरील भव्य यात्रा, 1997 साली ‘भानामती प्रबोधन धडक मोहीम’, 2003 साली नाशिकच्या सिहंस्थ मेळाव्याला विरोध व इचलकरंजीतील बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद, 2009 साली ‘राज्यव्यापी खगोलयात्रा’, 2012 साली विवेकवाहीनीतर्फे ‘राज्य युवा संकल्प परिषद’ आणि अखेरच्या काळातील 2013 मधील ‘जातपंचायत विरोधी परिषद’ या त्यांच्या काही भव्य आणि समाजात विधायक हस्तक्षेप नोंदवणाऱ्या मोहिमा होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments