इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
केडगाव (पुणे) : मागील अनेक महिन्यांपासून दौंड तालुक्यातील अनेक गावामध्ये मोबाईल कंपन्याचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने मोबाईल धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नेटवर्क मिळवण्यासाठी नागरिक आपला मोबाईल नंबर पोर्ट करत आहे. परंतु ज्या कंपनीकडे नंबर पोर्ट केलाय. त्या देखील मोबाईल कंपनीचा नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक व्यापारी व शाळकरी विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. संबंधित मोबाईल कंपन्यांनी मोबाईल नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी खुटबाव, केडगाव, पारगाव, गलांडवाडी, देलवडी, एकेरीवाडी, नाथचीवाडी अशा अनेक गावातील मोबाईल ग्राहक करत आहेत.
दौंड च्या या ग्रामीण भागांत अनेक मोबाईल नेटवर्क च्या छत्र्या आहेत. तर काही कंपन्यांनी आपले स्वतंत्र टावर उभारलेले आहेत. परंतु 10 ते 12 दिवसापासून या अनेक कंपन्यांनी ग्राहकांचे वांदे करून ठेवले आहे. मोबाईल ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी या हेतूने ठीक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँका-पतसंस्था, आरोग्य केंद्रे, पोस्ट ऑफिस, पुरवठा विभागाने स्वस्त धान्य वाटप ऑनलाईन केले आहे. मात्र वारंवार खंडीत होणाऱ्या मोबाईल नेटवर्क तसेच इंटरनेट अभावी सर्वांचेच हाल होत आहेत. त्यातच महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी तसेच पीक पाहणी साठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आर्थिक भार सोसावा लागत असून गैरसोय लोकांच्या जणू अंगवळणीच पडली आहे. त्यामुळे साहजिकच टॉवर आहे नावाला… रेंज नाही गावाला?’ अशी परिसरातील गावांची अवस्था आहे.
या व्यवस्थेत गडगंज पगारी वर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु हे अधिकारी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधाकडे लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सध्यातरी मोबाईल टॉवर्स शोभेची वस्तू बनले आहे. ग्राहकांची तक्रार किंवा फोनवर सूचना दिली तर त्यांची साधी दखलही घेतली जात नाही. आज घडीला मोबाईल कंपन्यांच्या भरोशावर स्थानिक बँक, सेमी गव्हर्मेंटची कार्यालय व हजारोच्या संख्येत असलेले मोबाईल धारक अवलंबून आहेत. परंतु याच मोबाईल कंपन्याकडून नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने अनेक वेळा बँकांमधील व्यवहाराला खोळंबा निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित मोबाईल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेऊन ग्राहकांना अत्यावश्यक व व्यवस्थित सुविधा मिळावी. यासाठी तातडीने उपाय योजना करुन सर्वच मोबाईल कंपन्यांनी दौंड तालुक्यातील सर्वच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क अविरत मिळेल, अशी सेवा देण्याची तरतूद करावी.