इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे जिल्हा परिषद मुख्यालयात मंगळवारी (दि. 25 मार्च) चक्क नोटांचा पाऊस पडल्याची घटना घडली. जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने स्वतःच्या गळ्यात नोटांचा हार घालून नोकरभरतीत जिल्हा परिषदेने अन्याय केल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नोटा उधळल्या. अनिल सिरसाट असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. यामध्ये दहा आणि वीस रुपयांच्या नोटा होत्या. यामुळे जिल्हा परिषद मुख्यालयात काही काळ मोठी खळबळ उडाली होती.
अधिक माहिती अशी की, नोटा उधळणारा हा मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रामपंचायतीचा कर्मचारी आहे. अनिल सिरसाट असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नोटा उधळल्यानंतर काही काळ सिरसाठ हे आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जिल्हा परिषदेच्या नोकरी भरतीत एकूण रिक्त जागांपैकी 10 टक्के जागा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या राखीव जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात येतात. यानुसार या कर्मचाऱ्याचा सेवा ज्येष्ठता यादीत 34 वा क्रमांक आहे. मात्र सन 2021-22 या वर्षी झालेल्या नोकर भरतीत आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप कर्मचारी सिरसाट यांनी केला आहे.
त्यांनी याबाबत अनेक वेळा आंदोलन केले आहे. शिवाय या मागणीसाठी शिरसाठ यांनी मंत्रालयातही आंदोलन केले आहे. त्यांच्यावर मंत्रालयातील आंदोलनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. नियम डावलून नोकरी भरती करता येत नाही. मात्र अपात्र असूनही नियुक्ती मिळण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.