इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. मार्केटयार्ड येथे नारळपाणी विक्रेत्याने विनाकारण ज्येष्ठाला शिवीगाळ करीत गालावर चापट मारल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्याने नारळ सोलण्याचे धारदार शस्त्र उगारून ज्येष्ठाच्या हाताचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नारळपाणी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश श्रीराम बलीपाठक (वय 40, रा. प्रेमनगर, मार्केटयार्ड, पुणे) असे नारळपाणी विक्रेत्याचे नाव आहे. तर चंद्रकांत रघुनाथ मोहोळ (वय 63, रा. तीन हत्ती चौक, धनकवडी, पुणे) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (30 मार्च) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. तक्रारदार मोहोळ हे मार्केटयार्ड येथील गेट क्रमांक एक समोरील बस स्थानकाजवळ नारळपाणी पिण्यासाठी थांबले होते. त्यानंतर नारळपाणी विक्रेता बलीपाठक याने विनाकारण फिर्यादी मोहोळ यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादीच्या गालावर चापट मारली. येवढेच नव्हे तर तक्रारदार मोहोळ यांच्यावर नारळ सोलण्याचे धारदार शस्त्र उगारले. स्वतःचा बचाव करत फिर्यादी यांनी आरोपीला विरोध केला. तेव्हा आरोपीने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या तळहाताचा चावा घेतला. यामध्ये फिर्यादी मोहोळ जखमी झाले.
दरम्यान, पीडित मोहोळ यांनी फिर्याद दिली असता पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली नारळ पाणी विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मिसाळ यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस हवालदार देसाई पुढील तपास करीत आहेत.