इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः जीबीएस आजाराशी संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शहरातील ससून रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे आता राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ११ वर पोहचली आहे.
अधिक माहिती अशी की, ससून हॉस्पिटल मध्ये एका ३७ वर्षीय पुरुषाचा गुइलेन बॅरे सिंड्रोम मुळे मृत्यू झाला आहे. मयत झालेली व्यक्ती सोनवडी (ता. दौंड) येथील रहिवासी होता. या रुग्णाची तपासणी झाल्यानंतर जीबीएसचे निदान झाले होते. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याचा सोमवारी (१७फेब्रुवारीला) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तर दुसरीकडे पुण्यातील एका खासगी हॉस्पिटल मध्ये एका २६ वर्षीय तरुणीचा गुइलेन बॅरे सिंड्रोमने मृत्यू झाला आहे. मृत तरुणी शहरातील नांदेड सिटीमध्ये राहायला होती. ती आजारी पडल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. त्यानंतर अधिक प्रकृती बिघडल्यानंतर तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र तिचा मंगळवारी १८ फेब्रुवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे.