इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरी-चिंचवड : पुण्यात पसरलेल्या गुइलेन बॅरी सिंड्रोम याआजारामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत जीबीएसच्या ५ रुग्णांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अशुद्ध पाण्यामुळे जीबीएस वाढत असल्याचे समोर आले असताना आता पिंपरी चिंचवड शहरात १३ ठिकाणाचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा धक्कादायक अहवाल वैद्यकीय विभागाने दिला आहे. मात्र दुसरीकडे वैद्यकीय विभागाचा अहवाल चुकीचा असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
एकाच भागातील पाण्याच्या दोन अहवालात वेगवेगळे दावे
अधिक माहिती अशी की, आता वैद्यकीय आणि पाणीपुरवठा विभागातील समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. जीबीएसची लागण झालेल्या रुग्णांच्या घरातील पाण्याचे वैद्यकीय विभागांने नमुने घेऊन परीक्षण केलं. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात १३ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल वैद्यकीय विभागाने दिला होता. या अहवालाने मोठी खळबळ उडाली होती. मात्र पुन्हा एकदा त्याच ठिकाणचे नमुने पाणीपुरवठा विभागाने घेतले. आणि त्यातून वैद्यकीय विभागाचा अहवाल चुकीचा आहे असा दावा करत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.
या एकाच ठिकाणच्या दोन अहवालांमुळे नेमका पाणीपुरवठा विभागाचा अहवाल खरा मानायचा की वैद्यकीय विभागाचा? अश्या संभ्रमात शहरवासीय नागरिक पडले आहेत. या प्रकारामुळे पालिका आयुक्त शेखर सिंग यांच्या कार्यशैलीवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे.